मी नशा शोधत होतो
मला झिंग हवी होती
मग मी विष चघळले
अगदी दाता खाली चावले
मी विष जाळून पिलो
कश पे कश, दम पे दम
धुरा संगे साठवले छातीत
झिंगलो काही काळ
पुन्हा शोध
नशा नशा, झिंग झिंग
विष प्याल्यातून प्यालो
एका मागून एक, दिवसा मागून दिवस
हर संध्याकाळ, कित्येक रात्री
ओलावले ओठ, ओलावला कंठ
मन मात्र तहानलेले तसेच
दिस रात्र झाले एक
आधी मी प्यायचो
आता ती मला पिते
तरीही चढेना
नशा नशा, झिंग झिंग
नाही नाही ते केले
वेडावून भटकलो, थकलो
विसावलो तलाव काठी
प्यायलो थोडेसे पाणी
आहा ! काहीशी भागली तहान
गोड रसभरीत , अजून प्यालो
पहुडलो हिरव्या माईच्या कुशीत
मोकळा श्वास, मिटले डोळे
शांती आत, बाहेर
पक्षी गुंजन, संगीत
आहाहा....
नशा नशा, झिंग झिंग
रमलो तसाच, विसरुन स्वतः स
अन ती आली, छान हसत
बिलगली मला, नाचवले तिने
उतरली मनात, नाना रुपात
व्वा वा...
नशा नशा, झिंग झिंग
तसाच झिंगत भारावूनी
आलो माघारी झोपडीत
चितारले काव्य शुभ्र रंगावर
उधळले रंग कागदावर
हा$$
नशा नशा, झिंग झिंग
धरली ओठी सहज बासरी
मदिरे हुनी उत्तेजक
फुंकले सुर मनीचे
ताल हाती धरीला ठेका
रंग अंतरी बदलला
हो हो
नशा नशा, झिंग झिंग
पुन्हा पुन्हा भटकलो
निसर्ग वनात
मूर्ती अनोखी पहाडी
रंग रांगोळी पठारी
रसरसून वाहते नदी
संतोष मनी
चढली चढली असली
नशा नशा, झिंग झिंग
.........नशेत रसिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा